आज दुपारी साहित्य नाट्य संमेलनाच्या नियोजनाच्या व्यस्ततेत सारसनगर भागात असताना सोबत असलेले प्रा. गणेश भगत यांच्या सोबत आनंदऋषी हॉस्पिटल जवळील भगवान महावीर भोजनालय येथे जेवण करण्याचा योग आला. खरेतर हा क्षण माझ्यासाठी सुंदर अनुभव होता. कष्टकरी, रुग्णांचे नातेवाईक, गरजू व्यक्ती अतिशय अल्प दरात येथे भोजनाचा लाभ घेत होती.
खरंच सांगतो, येथील स्वच्छता, साफसफाई आणि मनप्रसन्न भोजन यामुळे हरखून गेलो होतो. येथील प्रत्येकाच्या डोळ्यांत असेच समाधानाचे भाव होते. खरेतर समाजात माणुसकी, सद्भावना अजून जिवंत आहे याची याक्षणी प्रचिती आली.
अहिल्यानगर येथील जैन बांधव आपल्या व्यवसायात, उद्योगात इमानेइतबारे काम करीत असताना “आपण समाजाचे देणे लागतो” ही भावना जपत असतात. भगवान महावीर यांच्या शिकवणुकीचा, त्यांनी दिलेल्या संदेशाचा आपल्या जीवनात अंगीकार करणाऱ्या या समाजाचे शहरासाठी निरपेक्ष योगदान असल्यामुळेच येथे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचा लाभ विविध जाती-धर्मातील गरजूंना होतो. ही शहरासाठी मोठी गोष्ट आहे.
समाजासाठी काही करण्याची भावना हल्ली दुर्मिळ होत चालली आहे. अशा वातावरणात जैन समाजाचे शहरवासीयांसाठी असलेले कार्य दीपस्तंभासारखे म्हणावे लागेल. आरोग्य, उपचार, अन्न, सेवा देण्यासाठी समाजातील अनेक घराणी शहरवासीयांसाठी मनापासून मोठे योगदान देत आहेत. यामुळे गरजूंना मदत होत असते. महत्त्वाचे म्हणजे, समाजातील ही माणसे आपण केलेल्या सेवेचा कधी डंका वाजवत नाहीत.
आनंदऋषी हॉस्पिटल, आनंद नेत्रालय येथील बाहेर गावाहून आलेले रुग्णांचे नातेवाईक आणि गरजू यांच्यासाठी असलेल्या महावीर भोजनालयाची एक साक्षात्कारी अनुभूती मिळाली. न राहवून भोजनालयाचे संचालक श्री. मिलापचंद पटवा यांना ते करीत असलेल्या कार्याविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली.
त्यांना आपण करीत असलेल्या या सेवेचा मोठा आनंद आहे. समाजासाठी निरपेक्ष भावनेने या माध्यमातून सेवा करण्याचा आनंद काही और आहे. याचे समाधान वेगळे आहे. “आयुष्यात ही सेवा माझ्या हातून होतेय यासारखे दुसरे सुख नाही. अजून काय हवं आयुष्यात…!” बोलता बोलता मिलापजी आपल्या या सेवा कार्यात व्यस्त झाले. त्यांना जीवनाचा अर्थ कळला होता. खऱ्या सुखाची प्रचिती काय असते हे समजले होते.
माझे हात आपोआप जुळले होते. मला मात्र त्यांच्यात देव दिसत होता. “आपण आपल्या आयुष्यात असं काय करू शकलो?” हा प्रश्न घेऊन मी पायऱ्या हळूहळू उतरू लागलो.
“भगवान महावीर भोजनालय” माझ्या शहराची ही एक सुंदर ओळख आहे.